ज्या ठिकाणी भाजी मंडई सध्या अस्तित्वात आहे तेथे भाजी विक्री सुरू करता येणार नाही. फिरत्या हातगाड्यांबाबत मात्र स्वतंत्र आदेश नंतर

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 14 एप्रिल 2020 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शहरातील सर्व भाजी मंडई बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तथापि, ज्या ठिकाणी भाजी मंडई सध्या कार्यान्वित आहे त्या ठिकाणच्या नजिकच्या मोकळ्या जागी भाजी मंडई सोशल डिस्टन्सिंगचा अंमल प्रभावीपणे करता येईल अशा ठिकाणीच सुरू केली जाणार आहे . मात्र जागा निश्चित झाल्यानंतरच सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत भाजी विक्री सुरू केली जाईल. याबाबतचे सुधारित आदेश आज जारी करण्यात आले. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोकळ्या जागांची तातडीने पाहणी करून त्या निश्चित करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजी मंडई सध्या अस्तित्वात आहे तेथे भाजी विक्री सुरू करता येणार नाही. फिरत्या हातगाड्यांबाबत मात्र स्वतंत्र आदेश नंतर निर्गमित करण्यात येणार आहेत. त्यामुळे फिरत्या हातगाड्यांवर भाजी विक्री तथा फळ विक्री करता येणार नाही. शिवाय इतर छोट्या टप-या अथवा भाजी केंद्रांवर देखिल भाजी अथवा फळ विक्री सुरू करता येणार नाही.