ताजा खबरे

पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टकडून ‘पीएम केअर’ आणि ‘मुख्यमंत्री रिलीफ फंडास’ प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत

पीसीईटीची वीस लाखांची मदत
संपादक-दिपक श्रीवास्तव 9373118087/9067865094
पिंपरी (29 एप्रिल 2020) : कोरोना कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव जगभर वाढत आहे. केंद्र व राज्य सरकार सर्व ते प्रयत्न करीत आहे. सरकारला इतर संस्थांनी पण पुढे येऊन आर्थिक मदत करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टने पंतप्रधानांच्या ‘पीएम केअर’ आणि मुख्यमंत्री यांच्या ‘मुख्यमंत्री रिलीफ फंडास’ प्रत्येकी दहा लाख रुपयांचा मदत निधी दिला आहे.
पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ऑन लाईन सभा घेण्यात आली. यावेळी पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्‌माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, एस.बी. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संदीप पाटील, एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, एस. बी. पाटील आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, एस. बी. पाटील व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.एन. नारायण, पीसीपीच्या प्राचार्या व्ही. एस. बॅकॉड, रजिस्टार योगेश भावसार आदी सहभागी झाले होते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी ‘पीएम केअर’ आणि ‘मुख्यमंत्री रिलीफ फंडा’स प्रत्येकी दहा लाख असा वीस लाख रुपये निधी देण्याचा ठराव मांडला त्यास सर्व विश्वस्त मंडळाने अनुमोदन दिले.
तसेच अध्यक्ष लांडगे यांनी सांगितले की, कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या संकटाचे प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी संधीमध्ये रुपांतर करावे. यासाठी संस्थेने ‘लीडर स्पीक’ नावाने फेसबुक लाईव्ह व्दारे आधुनिक संकल्पनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व काही ‘ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स’ सुरु केले आहेत. त्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहाय्य प्राध्यापकांना उपलब्ध करून दिले आहे. याचा अनेक विद्यार्थी लाभ घेत आहेत. तसेच यामध्ये संस्थेचे माजी विद्यार्थी देखील सहभागी होत आहेत. त्यांच्या अनुभवांचा फायदा नवीन विद्यार्थ्यांना होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत पीसीईटी संस्था संलग्न आहे. ही संस्था राष्ट्रीय स्तरावरील एनबीए (National Board of Acredation) आणि नॅक (NAAC) तसेच आयएसओ प्रमाणित नामांकित संस्था आहे.
राष्ट्रीय पेटंट नोंदणीमध्ये एका दिवसात जास्त पेटंट नोंदणी करणारी संस्था म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. उत्कृष्ट आधुनिक शिक्षण, मार्गदर्शन व उत्तम रोजगारांच्या संधीसाठी महाराष्ट्रात ख्यातनाम असणारी पीसीईटी ही संस्था आहे. तसेच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून संस्था नेहमी मदत करीत असते. जसे की, मागील वर्षी सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या पुरामध्ये पुरग्रस्त भागातील नागरिकांसाठी पाच लाख रुपयांचा मदतनिधी संस्थेने दिला होता.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन काळात सर्व नागकिरांनी सरकार, पोलिस आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले.