कोविड-19 इनोवेशन चॅलेंज स्पर्धेचे आयोजन पीसीसीओईचा नव संशोधकांना चालना देणारा उपक्रम

संपादक-दिपक श्रीवास्तव 9373118087/9067865094
पिंपरी, पुणे (2 मे 2020) : पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) वतीने ‘‘कोविड-19 इनोवेशन चॅलेंज’’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विविध शाखेतील आजी-माजी विद्यार्थी नवउद्योजक, लघुउद्योजकांच्या संशोधक व चिकित्सक वृत्तीस चालना देणारी स्पर्धा आहे.
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे अवघे जग ठप्प झाले आहे. भारतात देखील अनेक राज्यात व शेकडो जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोना कोविड-19 वर विजय मिळविण्यासाठी देशभरातील डॉक्टर, संशोधक, केंद्र व राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था व देशभरातील संशोधक निकराचे प्रयत्न करीत आहेत. हजारो उच्च शिक्षित व्यक्तीदेखील यासाठी संशोधन करू इच्छित आहेत. त्यांना सर्वांगीण पाठबळ देण्यासाठी पीसीसीओईने या स्पर्धेतून उत्तम दर्जाचे व्यासपीठ या स्पर्धेव्दारे उपलब्ध करून दिले आहे.
ही स्पर्धा पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्‌माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक व संशोधन विकास विभाग प्रमुख डॉ. संजय लकडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
नॅशनल इनोवेशन स्टार्टअप पॉलिसी फॉर स्टुडंट ॲण्ड फॅकल्टी ऑफ हायर एज्यूकेशन इन्स्टिट्यूट अंतर्गत होणा-या स्पर्धेत कोणत्याही शाखेत शिकणारे आजी-माजी, विद्यार्थी स्वत:चा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरु करण्याची इच्छा असणारे संशोधक विद्यार्थी, व्यक्ती किंवा संस्था सहभाग घेऊ शकतात.
स्पर्धकांनी पुढील सहा आव्हानांपैकी कोणत्याही आव्हानावर (चॅलेंज) आपले संशोधक व नवसंकल्पना A4 पेपरवर सादर करायची आहे.
1) साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वापरण्यात येणा-या मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी आणि वापरलेले मास्क निर्जंतुकीकरण करण्यासाठी कमी खर्चातील उपकरण बनविणे किंवा यासाठी नवीन संकल्पना तयार करणे. 2) इनोवेटीव मास्क डिझाईन. 3) स्पर्श न करता शरीराचे तापमान मोजण्यासाठीचे उपकरण. 4) कमी किंमतीत बनविता येणारे व्हेंटीलेटर. 5) सॅनिटायझरला पर्याय. 6) कोविड-19 च्या रुग्णांना सेवा पुरविणा-या डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडीकल स्टाफ, पोलिस आणि प्रशासनाला मदत करू शकणा-या रोबोटची निर्मिती या विषयांवर संकल्पना सादर कराव्यात.
निवडक विजेत्यांना पीसीईटीच्या इन्क्यूबेशन सेंटर प्रकल्पांतर्गत खालील मदत करण्यात येणार आहे. कंपनीची स्थापना व नोंदणी करणे, त्यांच्या नव संकल्पनांचे व्यवसायिक उत्पादनात रुपांतर करण्यासाठी सर्व मदत व मार्गदर्शन करणे, अर्थसहाय्य, प्रोटोटाईप डेव्हलपमेंट (उत्पादनासाठी संस्थेच्या कार्यशाळेत मार्गदर्शन) तसेच थ्रीडी (3D) मॉडेलिंगसाठी ड-सॉल्ट सिस्टिम कंपनीचे ‘कटिया सॉलिड वर्क्स’ हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सहभागी व्यक्ती घरी बसून देखील संशोधन करू शकतील. तसेच विजेत्यांना रोख बक्षीस आणि सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या इन्स्टिट्यूशन्स इनोवेशन कौन्सिलच्या वतीने पीसीईटीच्या इनोवेशन सेलने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी अटल इन्क्यूबेशन सेंटर पिनॅकल, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, लायन्स क्लब इंटरनॅशनल, लघु उद्योग भारती आणि ड सॉल्ट कंपनी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

ही स्पर्धा सर्वांसाठी मोफत असून स्पर्धकांनी http://bit/pccoechallenge या लिंकवर 10 मे 2020 पर्यंत नोंदणी करावी तसेच 30 मे 2020 पर्यंत pccoecovid19challege@gmail.com या इमेलवर आपली संकल्पना सादर करावी. स्पर्धेचा निकाल 15 जून 2020 नंतर जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयक डॉ. संजय लकडे यांच्याशी 9325213417 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.