ताजा खबरे

लांडेवाडीत “आदर्श विवाह सोहळा” संपन्न नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांच्याकडून मास्क व सॅनिटायझरचे वाटप

सं. दीपक श्रीवास्तव 9373118087/9067865094

पिंपरी दि. ११ प्रतिनिधी : कोरोना आजाराचा विळखा दिवसेंदिवस गंभीर होत असून पिंपरी चिंचवड शहरात विविध भागांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने दुकाने आणि आस्थापनांना परवानगी मिळाली आहे. पण अजूनही शासनाकडून सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली नाही. अशातच लांडेवाडी येथील अशोक हुके यांचे चिरंजीव लखन हुके आणि रवी वाघमारे यांची कन्या नेहा यांचा मंगल परिणय सोहळा सर्व शासकीय परवानग्या घेऊन नुकताच पार पडला. अगदी मोजक्या वऱ्हाडी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम काटेकोरपणे पाळून हा विवाह संपन्न झाल्याने हा कोरोनाकाळात समाजाला एक आदर्श घालून देणारा सोहळा ठरला आहे.

शहरातील कोरोना बाधितांचा आकडा नऊशे रुग्णांचा टप्पा ओलांडत असला तरीही साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर वसाहतीत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. वसाहतीतील सर्व रहिवाशांनी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यामुळे हे शक्य झाले. हुके आणि वाघमारे परिवारातील हा मंगल परिणय सोहळा सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी सर्व रहिवाशांनी योगदान दिले. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोहळ्यात सहभागी झलेल्या सर्व पाहुण्यांना मास्क, सॅनिटायझर आणि आर्सेनिक अल्बम ३० या होमीओपॅथीक गोळ्यांचे वाटप केले. त्याबद्दल दोन्ही कुटुंबीयांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

या आदर्श विवाह सोहळ्यासाठी लांडेवाडी येथील शाम घोडके, प्रकाश भडकुंबे, जयकांत गव्हाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस अक्षय माछरे, किरण जोगदंड, अजय थोरात, राजू जाधव, विवेक भडकुंबे, अविनाश आदक यांनी सहकार्य केले. या विवाह सोहळ्याला सुरक्षित आणि आदर्शरित्या संपन्न केल्याबद्दल अशोक भडकुंबे यांनी सर्वांचे आभार मानले.