शिवसेनेला धक्का! शिवसेनेने संयमी, सुसंस्कृत नेतृत्व गमावले

VASTAVCHAKRA NEWS

शिवसेनेने संयमी, सुसंस्कृत नेतृत्व गमावले

पिंपरी, 22 सप्टेंबर – शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमागे आमदार लक्ष्मण जगताप, तसेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख कार्यकर्ते यांनी महत्वपूर्ण भूमिका बाजवल्याचे समजते.

शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी जिल्हा प्रमुख या नात्याने अनेक विधायक उपक्रम, नावीन्यपूर्ण अभियाने राबवली आहेत. त्यांनी शाखा, गाव, प्रभाग भेट दौरे काढले. शिवसारथी, भगवा सारथी हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची सांगड घालून लोकोपयोगी कार्य केले. महापालिका, राज्य, केंद्र शासनाच्या नागरी हिताच्या योजना लोकाभिमुख होण्यासाठी गजानन चिंचवडे यांनी यंत्रणा उभारली.

गजानन चिंचवडे यांनी कोरोना काळात रक्ताचा तुटवडा असल्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर रक्तदान, प्लाझ्मा दान व इतर सेवाभावी उपक्रम राबवले. या विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने संघटना कार्यरत ठेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले.

सन 2009 विधानसभा, सन 2014 लोकसभा आणि विधानसभा, सन 2019 लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीत गजानन चिंचवडे यांच्याकडे शिवसेना पक्षाने प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पडली. त्यांनी त्यांच्या परीने बेरजेचे राजकारण, समाजकारण करीत कार्यकर्ता जोडण्याचे काम प्रामाणिकपणे केले. पण पक्षाकडून त्यांना कायमच डावलण्यात आले. आज शिवसेनेने एक हाडाचा कार्यकर्ता, संयमी, सुसंस्कृत नेतृत्व गमविले, असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे.