सारस्वतांच्या पसायदानला श्रम नेतृत्वाचे मैत्र जीवी योगदान

VASTAVCHAKRA NEWS

साहित्य परिषदेच्या कार्यालयाला नाममात्र दराने जागा, कामगार नेते केशव घोळवे यांनी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका

पिंपरी-
पिंपरी-चिंचवड नगरीमध्ये सांस्कृतिक विकासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेला स्वतःच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध नव्हती. गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवड शहरातील अनेक साहित्यिक कार्यालयाला जागा मिळावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अर्ज विनवण्या करत होते. मात्र आजवर त्यांच्या प्रयत्नांना यश आले नव्हते. अखेर सारस्वतांच्या या पसायदानाला कामगार नेते केशव घोळवे यांनी मैत्र जीवी योगदान बहाल करून साहित्य परिषदेच्या कार्यालयाला नाममात्र दराने जागा उपलब्ध करून द्यावी असा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेतला.
पिंपरी चिंचवड शहर नावारूपाला येत असताना त्यांची सांस्कृतिक जडण-घडण देखील चांगली व्हावी यासाठी गेल्या पन्नास वर्षांत अनेकांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सारस्वतांनी आपल्या साहित्य पूंजीद्वारे या शहराच्या या जडणघडणीत मौलिक कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची पिंपरी चिंचवड शाखा गेली अनेक वर्षे विविध उपक्रमांच्या माध्यमातून या शहराच्या नावलौकिकात भर घालत आहे. मात्र या साहित्यिकांना स्वतःची हक्काची जागा नव्हती. गेली अनेक वर्षे साहित्य परिषदेची पिंपरी चिंचवड शाखा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विनवण्या पत्र लिहीत आहे परंतु आश्‍वासनांशिवाय त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र ही बाब कामगार नेते, माजी उपमहापौर व विद्यमान नगर सदस्य केशव घोळवे यांना कळाल्यावर त्यांनी याबाबत तातडीने भूमिका घेतली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या पुढे त्यांनी या सारस्वतांची कैफियत मांडली. तसेच काल झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत साहित्य परिषदेच्या कार्यालयाला नाममात्र दराने जागा उपलब्ध करून द्यावी असा प्रस्ताव मंजूर करून घेतला. केशव घोळवे यांनी या प्रस्तावात म्हटले आहे की, महाराष्ट्र साहित्य परिषद ही लोकमान्य टिळक साहित्य सम्राट न.चि.केळकर आणि न्यायमूर्ती रानडे
यांनी ११५ वर्षा पूर्वी स्थापन केलेली मराठीची मातृ संस्था आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची पिंपरी चिंचवड
शाखा ३० वर्षापासून पिंपरी चिंचवडमध्ये साहित्य चळवळ राबवित आहे. तसेच मराठी भाषेचा प्रचार, प्रसार
आणि माहित्यिक उपक्रमही राबवित आहेत.
वाचन संस्कृतिच्या समृद्धीसाठी राबणा-या या संस्थेला कोणतेही अनूदान किंवा उत्पन्न नाही. तसेच
स्वत:चे कार्यालय किंवा उपक्रमासाठी हक्काचे सभागृह अथवा जागा नाही.
प्राधिकरण येथील तुकाराम संकुलमध्ये सी विंग मधील २ मजल्यावरील ११७२ चौ.फूट गाळा ब-याच
वर्षापासून रिकामा आहे. सदर जागा महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड साठी पुरेशी असून साहित्यिक
उपक्रम राबविण्यासाठी उपयुक्त आहे. तरी सदर गाळा ३० वर्षासाठी नाममात्र दराने मिळण्यास मान्यता
देण्याची विनंती आहे. केशव घोळवे यांच्या या प्रयत्नाने आता साहित्य परिषदेला स्वतःचे हक्काचे छत मिळेल.