६ महिने निवडणूका लांबल्या विधानसभा आणि विधान परिषदेत विधेयक मंजूर ;

VASTAVCHAKRA NEWS- EDITOR-DEEPAK SHRIVASTAV
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना, निवडणुकांचे वेळापत्रकाचा अधिकार राज्य सरकारकडे
  • विधानसभा आणि विधान परिषदेत विधेयक मंजूर ; ६ महिने निवडणूका लांबल्या

VASTAV CHAKRA NEWS: PIMPRI

नवीन प्रभाग रचना जाहीर होताच प्रभागनिहाय इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली होती. भेटीगाठी, फ्लेक्सबाजी सुरु करण्यात आली होती. मात्र आता इच्छुकांना आपले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी पुन्हा वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहावे लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत नियोजित असलेल्या निवडणुका किमान सहा महिने पुढे जाणार आहेत. या नवीन निर्णयामुळे इच्छुकांमध्ये आता नाराजी पसरली असल्याचे दिसते.

विधेयक सोमवारी (दि. ७) दोन्ही सभागृहांत कोणतीही चर्चा न करता मंजूर झाले आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हे विधेयक मांडले. सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच गोंधळ निर्माण झाला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळत नाही तो पर्यंत निवडणुका नको, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली होती. निवडणूक आयोग सध्या त्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱामुळे निवडणूक जाहीर करू शकतो. त्यात बदल करून निवडणुकांच्या तारखा ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळावे, यासाठी हे विधेयक मांडण्यात आले आहे.

दरम्यान पिंपरी चिंचवड मधील अनेक प्रभागात इच्छुकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. सर्व प्रभागात फ्लेक्सबाजी, मतदारांच्या भेटीगाठी, सुरु करण्यात आल्या आहेत. निवडणूक कधी होईल हे अनेकांना निश्चित सांगता येत न्हवते. मात्र कधीही निवडणुका लागतील. आपण त्यासाठी तयार हवे म्हणून अनेकांनी मोठा खर्च करायला सुरुवात केली. मात्र आता नियोजित निवडणुका लांबणीवर जाणार असल्याने इच्छुकांमध्ये पुन्हा नाराजीचा सूर पसरला आहे. प्रसिद्धी माध्यमातून येणाऱ्या बातम्या तपासून पाहण्याचा कल अनेकांचा दिसत आहे. त्यामुळे नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता पुन्हा वाट पाहावी लागेल हे मात्र नक्की.