अनिमिया मुक्त पिंपरी चिंचवड शहर करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी “मिशन अक्षय”

VASTAV CHAKRA NEWS

पिंपरी, दि. १७ जून  २०२२:-  अनिमिया मुक्त पिंपरी चिंचवड शहर करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी  “मिशन अक्षय” मोहिमेमध्ये सहभागी व्हावे,  असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले. 

शहराच्या विकासात महापालिकेचे  अधिकारी कर्मचारी महत्वपूर्ण घटक असून म्हणून  ते अनिमिया  मुक्त असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी रक्त तपासणी करून घेऊन रक्तातील लोहाचे प्रमाण कमी असल्यास त्यावर लगेचच  वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे देखील आयुक्त पाटील म्हणाले.

          पिंपरी चिंचवड शहराला अनिमिया  मुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर शहरात “मिशन अक्षय”  मोहिम सुरु करण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कार्यरत असणाऱ्या  महापालिका अधिकारी आणि कर्मचारी तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत  “हिमोग्लोबिन तपासणी” शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात सुमारे  सातशे पंचेचाळीस (स्त्री- दोनशे पासष्ट, पुरुष- चारशे ऐंशी)  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत हिमोग्लोबिन तपासणी केली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त पाटील  बोलत होते.  यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. शैलजा भावसार, डॉ. सुनिता साळवे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक , महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका, पत्रकार दीपक श्रीवास्तव, पत्रकार  आदी उपस्थित होते.

            आयुक्त पाटील म्हणाले, कर्मचा-यांनी दैनंदिन जीवनात कर्तव्य बजावताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रक्तामध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनिमिया  हा आजार जडतो, त्यामुळे कर्माचा-यांच्या आरोग्यावर पर्यायाने कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यासाठी रक्तामध्ये हिमोग्लोबिन आवश्यक प्रमाण राखणे गरजेचे आहे. अॅनिमिया रोगाशी लढण्यासाठीसर्वांनी आपल्या हिमोग्लोबिनची तपासणी करावी. अॅनिमिया चे निदान करून त्यावर योग्य उपचार केल्यास अॅनिमिया  बरा होतो. त्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, ठेकेदाराकडील कर्मचारी यांच्या हिमोग्लोबिन तपासणीसाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन तपासणी करून घ्यावी, असे आयुक्त पाटील म्हणाले.

            आयोजित केलेल्या अनिमिया  तपासणी शिबिरात सहभागी अधिकारी, कर्मचारी यांना अनिमिया  मुक्त भारत कार्यक्रमांतर्गत शासन मार्गदर्शक सूचनांनुसार उपचारात्मक जंतनाशक व प्रतिबंधात्मक गोळ्या देण्यात आल्या. तसेच एनिमिक अधिकारी, कर्मचारी यांना उपचारात्मक सेवा देण्यात येणार आहे.  याठिकाणी आयोजित अॅनिमिया  तपासणी शिबीरात कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राच्या माध्यमातून सुमारे १८५ अधिकारी, कर्मचारी यांना बुस्टर डोस देण्यात आले.

 दरम्यान,  महापालिकेच्या सर्व दवाखाना, रुग्णालय स्तरावर “मिशन अक्षय” मोहीम राबविण्यात येत आहे.  बालके, किशोरवयीन मुले – मुली, महिला यांच्यामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया  हा आजार होतोत्यामुळे त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ कमी होते. त्यासाठी “मिशन अक्षय” मोहिमे अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रामध्ये अंगणवाडी, शाळा, दवाखाने, रुग्णालयांमधून बालकांना, विद्यार्थ्यांना तसेच महिलांना जंतनाशक व प्रतिबंधात्मक गोळ्या देऊन मोहिमेचे उदिष्ट्य साध्य करण्यात येणार आहे. अॅनिमिया  मुक्त पिंपरी चिंचवड शहर करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करून अनिमिया  विषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती देखील आयुक्त पाटील यांनी यावेळी दिली.

  सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी अनिमिया मुक्त पिंपरी चिंचवड शहर करण्यासाठी  “मिशन अक्षय” मोहिमेमध्ये सहभागी होऊन  “माझे कुटुंब अॅनिमिया  मुक्त कुटुंब” करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.