पुणे

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पवनाथडी जत्रेस भेट

VASTAV CHAKRA NEWS – संपादक-दिपक श्रीवास्तव

पिंपरी, दि. १७ डिसेंबर २०२२:-महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा आहेत. महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास ते अधिक सक्षमपणे काम करतील. बचत गटांनी नागरिकांची गरज ओळखून नवे उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न करावा. त्या दृष्टीने समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना शुभेच्छा दिल्या, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार उमा खापरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी महापौर माई ढोरे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर , विशेष अधिकारी किरण गायकवाड, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार , नामदेव ढाके, माजी नगरसदस्य शंकर जगताप, सुरेश भोईर, सागर आंगोळकर , हर्षल ढोरे, अभिषेक बारणे , शत्रुघ्न काटे , अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, विनायक गायकवाड, माजी नगरसदस्या माधवी राजापुरे, उषा मुंडे, शारदा सोनवणे यांच्यासह महिला बचत गटाचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, महिला स्वावलंबीकरण समाजाच्या प्रगतीला पोषक असते. महिला बचतगटांना नवतंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याबद्दलचे प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास ते अधिक सक्षमपणे काम करतील. बचत गटांनी नागरिकांची गरज ओळखून नवे उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. बचतगटांना असे नवे प्रयोग करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असेही श्री.पाटील म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवनाथडी यात्रेच्या माध्यमातून विविध बचत गटांना चांगली संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगून अशा उपक्रमाद्वारे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळेल, असे पालकमंत्री म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
यावेळी पालकमंत्री श्री पाटील यांनी पवनाथडीतील महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन तेथील काही वस्तू देखील खरेदी केल्या.