पिंपरी चिंचवड

जाधववाडी, बोऱ्हाडेवाडीत क्रीडांगणासाठी लोकप्रतिनिधी एकवटले!

VASTAV CHAKRA NEWS- संपादक – दीपक श्रीवास्तव
  • स्थानिक नागरिकांसाठी खेळाचे मैदान, उद्यान विकसित करण्याची मागणी
  • माजी महापौर राहुल जाधव यांचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी
जाधववाडी आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात नागरीकरण वाढले असून, स्थानिक नागरिकांसाठी पायाभूत सोयी-सुविधा सक्षम कराव्यात. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान आणि मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करावे, अशी मागणी माजी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे.

याबद्दल मोशी, बोऱ्हाडेवाडी आणि जाधववाडी परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिंच्या उपस्थितीमध्ये महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव, सामाजिक कार्यकर्ते नितीन बोऱ्हाडे, निलेश बोराटे, संतोष जाधव, निखिल बोऱ्हाडे, सोनम जांभुळकर आदी उपस्थित होते.
आयुक्तांना दिलेल्या निवदनामध्ये म्हटले आहे की, जाधववाडी- बोऱ्हाडेवाडी येथे ‘एसटीपी’ची जागा ही खेळाच्या मैदानासाठी योग्य आहे. तसेच, परिसरात गार्डनसाठी एकही आरक्षण नाही. त्यामुळे खेळाचे मैदान व गार्डन हे १/ १३० या आरक्षणामध्ये गट नंबर ९० मध्ये विकसित करण्यात यावे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट गाव जाधववाडी आणि बोऱ्हाडेवाडी या भागातील सोसायटीधारक आणि रहिवाशांची संख्या मोठी आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, या भागात उद्यान व खेळाचे मैदान विकसित करण्याची आवश्यकता आहे, अशी भावना स्थानिक लोकप्रतिनिधींची आहे.


प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी…
सदर गावांचा समावेश महापालिका हद्दीत होवून आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे विकास आराखड्याप्रमाणे पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करणे प्रशासनाची जबाबदारी असून, नागरिक लोकप्रतिनिधींकडे तगादा लावत आहेत. या बाबींचा विचार करुन जाधववाडी आणि बोऱ्हाडेवाडी या भागातील मोकळ्या जागेत उद्यान आणि खेळाचे मैदान विकसित करावे. त्यामुळे नागरिक आणि मुलांना सुविधा होईल. यासाठी प्रशासनाने सकारात्मक पुढाकार घ्यावा, अशी अशी मागणीही माजी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे.